औरंगाबाद: अतिशय अटीतटीच्या झालेल्या लढतीत चंद्रकांत खैरे यांना पराभूत एमआयएमचा राज्यातील पहिला खासदार म्हणून निवडून येण्याचा मान पटकावणाऱ्या खा. जलील यांना त्यांच्या कामगिरीचे बक्षीस मिळाले आहे. एमआयएमचे प्रमुख खा. असदुद्दीन ओवेसी यांनी जलील यांची एमआयएमच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नेमणूक केली आहे.
२०१४ मध्ये जलील औरंगाबाद मध्य मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. यानंतर एमआयएमने जलील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाच्या राजकारणात चांगलाच जम बसवला. महापालिका निवडणुकीत एमआयएमचे तब्बल २३ नगरसेवक निवडून आणण्यात इम्तियाज जलील यांचा मोठा वाटा होता.
एकंदरीत जलील यांनी एमआयएमच्या महाराष्ट्रातील विस्तारात महत्वाची भूमिका बजावली. त्याचेच बक्षीस खा. जलील यांना यानिमित्ताने मिळाल्याची चर्चा आहे. याशिवाय, अकील मुजावर यांची पश्चिम महाराष्ट्र, नाजीम शेख विदर्भ तर फिरोज लाला यांची मराठवाडा विभागाचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.